जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२६
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ग्रुप ब मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून पारंपरिक बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान हे संघ सहभागी होते. स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन संघांना पुढील फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते; मात्र प्रत्यक्ष सामन्यांत वेगळंच चित्र दिसून आलं. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर धक्कादायक विजय मिळवत गटाचे समीकरण बदलले, तर त्यानंतर श्रीलंकेनेही ऑस्ट्रेलियाचा पराभव करत कांगारूंची अडचण अधिक वाढवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पुढील फेरीतील गणित ‘जर-तर’वर अवलंबून राहिले होते.
गटातील निर्णायक सामना झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात होणार होता; मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. कटऑफ वेळ संध्याकाळी ६.१० पर्यंत प्रतीक्षा करण्यात आली, परंतु पाऊस न थांबल्याने पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा करून सामना रद्द घोषित केला. नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळे झिम्बाब्वेच्या खात्यात एकूण ५ गुण जमा झाले आणि त्यांनी श्रीलंकेनंतर सुपर 8 फेरीत स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलियाने शेवटचा सामना जिंकला असता तरी त्यांच्या खात्यात केवळ ४ गुण झाले असते, त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. आयर्लंड आणि ओमान यांनाही पुढील फेरी गाठता आली नाही. 2009 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीतच बाहेर पडावे लागले आहे.
दरम्यान, अ गटातून भारताने दमदार कामगिरी करत सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. या गटातील दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध नामिबिया या सामन्याच्या निकालावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. नामिबियाने विजय मिळविल्यास अमेरिकेला संधी मिळेल; तर पाकिस्तानने विजय मिळवला किंवा सामना पावसामुळे रद्द झाला, तर पाकिस्तान पुढील फेरीत पोहोचेल. त्यामुळे या सामन्याकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून असून सुपर 8 फेरीचे समीकरण अधिक रंगतदार बनले आहे.

![]()




