जळगाव समाचार | २ नोव्हेंबर २०२५
शहरातील बळीराम पेठ परिसरात दैनिक लोकशाहीच्या कार्यालयाबाहेर वरिष्ठ उपसंपादक दीपक चिंतामण कुलकर्णी (वय ४१, रा. धानोरा, ता. चोपडा) यांच्यावर रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. दुचाकीवर आलेल्या तिघा हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर बियरची बाटली फोडली, तर एकाने पोटात बाटली घुसवण्याचा प्रयत्न केला. कुलकर्णी यांनी तत्काळ प्रतिकार करत स्वतःचा बचाव केला, मात्र या झटापटीत त्यांच्या हाताला दुखापत झाली.
घटनेदरम्यान जवळील एका तरुणाने आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी पळ काढला आणि पळताना दगड फेकून धमकी देत पसार झाले. जखमी कुलकर्णी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. ते गेल्या २३ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून सध्या दैनिक लोकशाहीत वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.
या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, हल्लेखोर तिघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी संबंधितांचा शोध सुरू केला असून हल्ल्याचे नेमके कारण समजलेले नाही. घटनेने पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

![]()




