वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात कारवाई, लाखोंचा माल जप्त…

 

जळगाव समाचार डेस्क | २५ जानेवारी २०२५

चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगाव कक्ष क्रमांक २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे २४ जानेवारीच्या मध्यरात्री वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी वनरक्षक प्रकाश सुभाष पाटील यांच्यावर वाहन चढवून गंभीर जखमी केले.

वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी एक विना क्रमांकाची मोटारसायकल, सागवान लाकूड (०.१५१ घ.मी.) आणि इतर साधने जप्त केली असून त्याची किंमत अंदाजे ३०५६ रुपये आहे.

तपासादरम्यान चौगाव येथील एका आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कटाई मशीन, लाकूड कापण्याची अवजारे, ३५ सागवान लाकूड नग आणि एक तयार पलंग असा एकूण १,१४,६४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जखमी वनरक्षक प्रकाश पाटील यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आरोपींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वनकर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही गंभीर समस्या असून, असे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here