यावल:-तालुक्यातील किनगाव येथे दोन दिवसापूर्वी एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून तिने ही आत्महत्या एका तरुणाच्या छळाला कंटाळून केल्याची फिर्याद मयत महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिल्याने एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने विवाहितेला माझ्याशी प्रेम संबंध ठेवा अन्यथा तुझ्या पति सह मुलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन मानसिक छळ केल्यानेच पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार पतीने दिली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील रहिवासी असलेल्या नीलिमा संजय कोळी वय 28 या विवाहितेने घरातील स्वयंपाक घरात दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पती संजय कोळी यांनी तात्काळ धाव घेऊन विळ्याने दोर कापून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेस मृत घोषित केले. दरम्यान संजय कोळी यांनी त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या रुपेश धनगर हा पत्नीकडे वाईट नजरेने पाहायचा याबाबत संजय कोळी यांनी त्याला जाब देखील विचारला होता. त्यामुळे पत्नी नीलिमा कोळी हिला रुपेश धनगर याने माझ्याशी प्रेम संबंध ठेवा नाहीतर तुझ्या पतीसह मुलांना ठार मारेल अशी धमकी दिल्याची फिर्याद संजय कोळी यांनी दिली असून त्यानुसार यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.