यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे . निलीमा कोळी (वय २८) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान मयत नीलिमा कोळी यांचे पती संजय कोळी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की एका तरुणाच्या मानसिक छळाला कंटाळून माझ्या पत्नीने आत्महत्या केल्या चे म्हटले आहे. याबाबत सदर तरुणाची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी संजय कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.
किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला. हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी संजय कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.