अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणार – आ. अनिल पाटील

 

जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२५

अमळनेर मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यास आमदार अनिल पाटील अनुपस्थित राहिले असले तरी ते सतत प्रशासनाशी संपर्कात राहून मदतकार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निम्न तापी पाडळसरे धरणासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या भेटीसाठी दिल्ली दौर्‍यावर असल्याने ते प्रत्यक्ष गावांना भेट देऊ शकले नाहीत. मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे पातोंडा, नांद्री, अमळगाव, खेडी तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे परिसरातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नांद्री–पातोंडा–अमळगाव भागात अनेक घरांनाही पूराचा फटका बसला आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी आणि कृषी विभागाला मदतकार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनीही पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आधीच देण्यात आले असून, ते पूर्ण होताच शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. “आज शेतकरी बांधवांवर संकट ओढावले असले तरी आपण सर्व मिळून त्याचा सामना करू. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे भावनिक आवाहन आमदारांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here