जळगाव समाचार डेस्क;
मुंबईतील अटल सेतू (Atal Setu) येथून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना काल 24 जुलै रोजी दुपारी घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती पुलावर गाडी थांबवते आणि नंतर पुलावर चढून समुद्रात कशी उडी मारते हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. करुतुरी श्रीनिवास (38) असे या व्यक्तीचे नाव. न्हावा शेवा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, करुतुरी श्रीनिवास (38) हा डोंबिवलीतील पलावा सीटीत पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. बुधवारी दुपारी 12.35 वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास याने मुंबईकडून सुमारे साडेतेरा किलोमीटर अंतरावर अटल सेतूवर जाऊन रस्त्यालगत आपली टाटा नेक्सॉन कार कं. एमएच-05 ईव्ही 0849 उभी करुन खवळलेल्या समुद्रात थेट उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अटल सेतूवरील टोल नियंत्रण कक्षाने न्हावा शेवा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. बी टेक अभियंता असलेला श्रीनिवास याने आपल्या कारमध्ये फक्त पाकीट ठेवले होते, त्यात त्याचे आधार कार्ड आणि लोढा कंपनीचे ओळखपत्र आढळून आले आहे. त्याच्या कारमधून कोणतीही सुसाईड नोट किंवा त्याचा फोन सापडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. एमटीएचएलच्या बचाव पथकाने आणि सागरी सुरक्षा पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र श्रीनिवास त्यांना सापडला नाही.
एमटीएचएलच्या बचाव पथकाकडुन आणि सागरी सुरक्षा पोलिसांकडुन त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. श्रीनिवास याने इतक्या टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण आर्थिक संकट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

![]()




