जळगाव समाचार | १८ नोव्हेंबर २०२५
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सांगू काना ठाकूर महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे यशस्वीरीत्या पार पडली. समर्थ कला बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी सलग पाचव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करताना जळगावच्या रंगभूमीला बळकटी देण्याचा आणि नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हेतू साधला. नाटक निर्मितीचा वाढता खर्च लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी प्रत्येक एकांकिका संघाला 1000 रुपयांची निर्मिती अनुदान मदत देऊन स्पर्धेला सहाय्य केले.
या प्राथमिक फेरीत जळगाव, धुळे, बुलढाणा आणि नागपूर या चार शहरांतील एकूण आठ एकांकिका सादर झाल्या. यात वि प्र – वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर गाईड – अभिनय नाट्यकला लोंढे, चाळीसगाव (जळगाव) यांनी द्वितीय स्थान मिळवले. नामदेव पायरी – माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन, बुलढाणा यांनी तृतीय आणि मारुतीची जत्रा – नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पार्श्वसंगीतासाठी प्रणिता जाधव (गाईड) प्रथम, मोहित सोनवणे (मारुतीची जत्रा) द्वितीय; लेखनासाठी अमोल ठाकूर (गाईड) प्रथम आणि ब्रिजेश (संघमित्र कलंदर) द्वितीय ठरले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार गणेश देशमुख (नामदेव पायरी) प्रथम, अथर्व रांधे (गाईड) द्वितीय; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ईशा पिंपळीकर (आमचं जुळतंय) प्रथम आणि वैष्णवी सोनवणे (मारुतीची जत्रा) द्वितीय यांना मिळाले. दिग्दर्शनाच्या विभागात तन्मय गंधे (वि प्र) प्रथम तर अमोल ठाकूर (गाईड) द्वितीय ठरले.
बक्षीस वितरण सोहळ्यात ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष व स्वामी समर्थ ग्रुपचे मनोज पाटील, समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव, परीक्षक प्रमोद शेलार व प्रमोद अत्रे, स्पर्धा संचालक अमोल खेर, गणेश जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन समन्वयक विशाल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश लांबोळे, भावेश पाटील, महेश कोळी, राहुल निकम, सागर सदावर्ते, पूर्वा जाधव, रोहिणी निकुम, पुनम जावरे आणि समर्थ जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

![]()




