सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात अभय कुरुंदकर दोषी…


जळगाव समाचार | ६ एप्रिल २०२५

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा अखेर निकाल लागला असून, पनवेल न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला मुख्य आरोपी ठरवून दोषी ठरवले आहे. तब्बल सात वर्षांनी या प्रकरणात निर्णय देण्यात आला असून, पुढील सुनावणी 11 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.

11 एप्रिल 2016 रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्याआधी त्यांनी अभय कुरुंदकर या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भेट घेतली होती. याच भेटीत कुरुंदकरने आपल्या कारमध्ये अश्विनी यांचा गळा दाबून निर्घृणपणे खून केला, असा आरोप आहे.

अश्विनींचा खून केल्यानंतर कुरुंदकरने आपल्या मित्र महेश फळणीकरच्या उपस्थितीत लाकूड कापायच्या कटरने त्यांच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर महेश फळणीकर, राजू पाटील आणि खासगी चालक कुंदन भंडारी यांच्या मदतीने हे तुकडे वसई-भाईंदर खाडीत फेकण्यात आले.

खुनानंतर अश्विनी जिवंत असल्याचे भासवण्यासाठी कुरुंदकरने त्यांच्या मोबाईलवरून अश्विनींच्या मेहुण्याला (अविनाश गंगापूरे) ‘मानसिक अस्वास्थ्यामुळे उत्तरांचल किंवा हिमाचलला उपचारासाठी जातो आहे’ असा खोटा व्हॉट्सॲप मेसेज केला. मात्र, ‘यू’ ऐवजी ‘Y’ असा इंग्रजी अक्षराचा वापर केल्यामुळे कुरुंदकर संशयाच्या भोवऱ्यात आला. कारण अश्विनी नेहमी ‘U’ असे लिहित असत. याच शब्दशैलीतून गुन्हे शाखेने तपासाचा धागा पकडत अखेर कुरुंदकरला अटक केली.

अश्विनी बिद्रे यांनी 2005 साली पोलिस दलात प्रवेश केला होता. सांगली येथे कार्यरत असताना त्यांची ओळख अभय कुरुंदकर यांच्याशी झाली. पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोघेही विवाहित असून त्यांच्या संसाराला मुले होती. कुरुंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन अश्विनींशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अश्विनींनी आपल्या पतीसोबतचे संबंध तोडले होते. त्यांना एक मुलगी असून ती सध्या वडिलांसोबत राहते.

पण कालांतराने कुरुंदकर लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. अश्विनींच्या वारंवार तगाद्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. अखेर हा त्रास संपवण्यासाठी कुरुंदकरने त्यांची हत्या करण्याचा कट रचला.

चौघांवर गुन्हा, एक निर्दोष

या प्रकरणात महेश फळणीकर व कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली, हेही तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, राजू पाटील याच्यावर दोष सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.

पुढील सुनावणी 11 एप्रिलला

या प्रकरणात अभय कुरुंदकरला भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणीसाठी 11 एप्रिल 2025 ही तारीख निश्चित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here