जळगावच्या आश्लेषा यावलकरचे आंतरराष्ट्रीय ASPA परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व; AI विषयावर सादर केला शोधप्रबंध…


जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५

जळगावच्या आश्लेषा राजेश यावलकर हिने अमेरिकेत भरलेल्या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत मोठे यश मिळवले आहे. अमेरिकन सोसायटी फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन (ASPA) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत तिने सहभाग घेतला. 27 मार्च ते 1 एप्रिल 2025 दरम्यान ही परिषद पार पडली.

या परिषदेत ‘शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा नैतिक दृष्टिकोनातून वापर’ या विषयावर आश्लेषाने संशोधन करून अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला. संपूर्ण भारतातून केवळ आश्लेषानेच या परिषदेत सहभाग घेतला आणि ती या परिषदेत सर्वात कमी वयाची शोधप्रबंध सादर करणारी विद्यार्थिनी ठरली.

ही परिषद वॉशिंग्टन डीसी येथील Mayflower या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली, जे व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगच्या अगदी जवळ आहे. या परिषदेत विविध देशांतील प्राध्यापक, प्रोफेसर, आणि डॉक्टरेट अभ्यासकांसमोर आश्लेषाने आपला शोधप्रबंध सादर केला.

याच परिषदेत झालेल्या आंतरराष्ट्रीय डिबेट स्पर्धेतही आश्लेषाने पहिले पारितोषिक पटकावले. यापूर्वीही आश्लेषाने PDEU (पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी, अहमदाबाद) मार्फत भारताचे श्रीलंका आणि चीन येथे प्रतिनिधित्व केले आहे.

आश्लेषा ही ग्रॅज्युएशनच्या तीन वर्षांत तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी असून तिच्या बुद्धिमत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ASPA परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि सादरीकरणासाठी तिला रेड्डी सर, श्रीराम सर, दुष्यंत दवे सर आणि विद्यापीठाचे डायरेक्टर ए. के. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

आश्लेषाचे हे आंतरराष्ट्रीय यश जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here