जळगाव समाचार | २० ऑक्टोबर २०२५
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी भूमिकांचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे असरानी यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन असरानी असे त्यांचे पूर्ण नाव असून, पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत अभिनयाची अमिट छाप सोडली. ‘अभिमान’, ‘छोटीसी बात’, ‘गुड्डी’, ‘शोले’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिल्या आहेत.
असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये विविध ढंगी भूमिका साकारल्या. मात्र ‘शोले’ चित्रपटातील त्यांच्या “जेलर” या भूमिकेने त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले. हिटलरच्या शैलीत साकारलेला हा जेलर प्रेक्षकांना हसवून गेला आणि आजही ती भूमिका स्मरणात आहे. जय, वीरू, बसंती, ठाकूर यांच्या बरोबरीने असरानींचा जेलर हा व्यक्तिरेखा चित्रपटातील महत्त्वाचा आकर्षणबिंदू ठरला होता.
असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. सेंट झेवियर्स शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजस्थानमधील महाविद्यालयातून पदवी घेतली. सुरुवातीला रेडिओ आर्टिस्ट म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली आणि नंतर चित्रपटसृष्टीकडे वळले. ‘हरे कांच की चूडिया’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनयाच्या प्रवासात अनेक अडथळे आले, परंतु त्यांच्या मेहनतीने आणि वेगळ्या अभिनयशैलीने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली.
असरानी यांनी २००४ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय प्रचारही केला होता. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी, संवेदनशील आणि प्रेक्षकांना हास्याची पर्वणी देणारा कलाकार गमावला आहे. त्यांच्या निधनाने विनोदी भूमिकांतील एक स्वतंत्र युग संपुष्टात आल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.

![]()




