जळगाव समाचार डेस्क | २ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रातील जल पर्यटनाला नवे परिमाण देणारा पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सव जळगावच्या मेहरूण तलावात आज पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरू झाला. या कार्यक्रमात त्यांनी मेहरूण तलावाच्या जल क्रीडा पर्यटनासाठी 15 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच तलावाच्या सुशोभिकरणासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाजन यांनी जल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात मोठे पाऊल उचलल्याचे सांगितले. जळगावकरांसाठी कायम स्वरूपी जल पर्यटन प्रकल्प येथे राबविण्यात येणार असून, आवश्यक तांत्रिक बाबींवर लगेच काम सुरू केले जाईल. जल क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जळगाव हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनणार असल्याचे महाजन म्हणाले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जल पर्यटनाचा थरारक अनुभव
महाजन यांनी उद्घाटनानंतर स्पीड बोट चालवून जल क्रीडा पर्यटनाचा थरारक अनुभव घेतला. बोटीने तलावाच्या तीन फेऱ्या मारताना त्यांनी स्वतः 90 किमी प्रति तास वेगाने बोट चालवत, उपस्थितांना रोमांचक अनुभव दिला.
राज्यात पर्यटन धोरणाची अंमलबजावणी
राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी नवीन पर्यटन धोरण राबविले जात असून, समुद्रकिनारी आणि वन पर्यटनाला चालना देण्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.