जळगाव समाचार डेस्क| ३१ जुलै २०२४
राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहिण योजनेसह मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार असल्याचेही यात सांगितले होते. आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली अआहे. त्यामुळे लाडकी बहिण आता अन्नपूर्णा योजनेचाही लाभ घेऊ शकणार आहे. त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत (gas cylinder) मिळणार आहेत.
राज्यात 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो.असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील नेमक्या लाभार्थ्यांची संख्या कळू शकेल. योजनेसाठी एका कुटुंबात (शिधापत्रिकेप्रमाणे) एक लाभार्थी पात्र असेल.
उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रतिसिलिंडर 830 रुपये जमा करणार आहे.
- या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.
- 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल.
- 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

![]()




