जळगाव समाचार | १५ एप्रिल २०२५
यावल तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी तापी नदीपात्रात बुडून माय-लेकासह तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये अंतुली (ता. अमळनेर) येथील वैशाली सतीष भिल (वय २८) व तिचा मुलगा नकुल (वय ५) तसेच पळाशी (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सपना गोपाल सोनवणे (वय २७) यांचा समावेश आहे.
वैशाली व सपना या अंजाळे येथील घाणेकर नगरमध्ये बादल भिल यांच्या घरी गोंधळ कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर दुपारी सव्वा बारा वाजता ते अंघोळीला आणि कपडे धुण्यासाठी तापी नदीच्या डोहात गेले होते. मात्र पाय घसरल्याने ते खोल पाण्यात बुडाले.
घटनेनंतर गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रफुल्ल ठाकूर, उपनिरीक्षक मसलोदीन शेख आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण अंजाळे परिसरावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.