जळगाव समाचार डेस्क | ४ डिसेंबर २०२४
अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रिपद मिळावे, यासाठी न्यू प्लॉट परिसरातील असंख्य सती मातेच्या भक्तांनी ग्रामदैवत सती मातेच्या चरणी साकडे घालत नवस मानला आहे. शुक्रवारी सती मातेच्या विशेष उपासनेदरम्यान हे साकडे घालण्यात आले.
यावेळी भक्तांनी मंदिरात एकत्र येऊन सती मातेच्या चरणी प्रार्थना केली. आमदार अनिल पाटील हे स्वतःही सती मातेचे भक्त असल्याने त्यांचा या मंदिराशी जिव्हाळा आहे. मागील वेळी मंत्रिपद मिळाल्यानंतर अमळनेर भूमीत पाय ठेवण्यापूर्वी त्यांनी सती मातेचे दर्शन घेतले होते. यंदाच्या नवरात्र उत्सवात पाटील परिवाराने सती मातेच्या प्रतिमांचे मोफत वितरण करून भक्तांमध्ये विशेष भक्तिभाव निर्माण केला होता.
आ. अनिल पाटलांच्या मंत्रिपदामुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळाल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे, अशी स्थानिकांची भावना आहे. विशेषतः निम्न तापी पाडळसरे धरण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि अमळनेर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हे मंत्रिपद महत्त्वाचे ठरेल, असे भक्तगणांनी सांगितले.