“जळगाव जिल्ह्यातील ५०,००० शेतकऱ्यांचे KCC आणि ISS किसान रिन पोर्टलवर लिंक न झाल्याने ३% व्याज परतावा हुकला – अनिल पाटील यांचा विधिमंडळात प्रश्न”

Oplus_131072

 

जळगाव समाचार | २६ मार्च २०२५

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे ५०,००० शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि व्याज सवलत योजना (ISS) किसान रिन पोर्टलवर लिंक न झाल्याने त्यांना केंद्र सरकारकडून मिळणारा ३% व्याज परतावा मिळू शकलेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर अतिरिक्त व्याजाचा आर्थिक बोजा वाढला असून, यासंदर्भात आज विधिमंडळात हा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला.

राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री व अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ही बाब विधिमंडळात मांडली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज व व्याज सवलतींच्या व्यवस्थापनासाठी ‘किसान रिन पोर्टल’ विकसित केले आहे. मात्र, या पोर्टलवर KCC आणि ISS योजनांची योग्य नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना व्याज परतावा मिळण्यात अडचणी येतात. सध्या जळगाव जिल्ह्यातील ५०,००० शेतकऱ्यांना या त्रुटीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी संबंधित बँक आणि सरकारी यंत्रणांना शेतकऱ्यांचे KCC आणि ISS पोर्टलवर त्वरित योग्य प्रकारे लिंक करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना व्याज परतावा मिळू शकेल आणि त्यांच्यावरचा अतिरिक्त व्याजाचा बोजा कमी होईल.

या समस्येमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून, लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांनी योग्य कार्यवाही केली नाही, तर शेतकरी संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here