जळगाव समाचार डेस्क | ४ नोव्हेंबर २०२४
अमळनेर – सर्व जाती-धर्म, क्षेत्र, आणि स्तरातील लोकांमध्ये एकोपा ठेवणारा कळमसरे-जळोद जिल्हा परिषद गट भाजपाच्या विश्वासाचा गट ठरला आहे. या गटातून यंदाही महायुतीच्या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळणार असल्याचा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विकासकामांमुळे जनतेचा पाठिंबा
या परिसरात धार्मिक आणि क्रांतिकारक वारसा लाभलेल्या भूमीला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचे कार्य महायुतीचे उमेदवार तथा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पासाठी ४८०० कोटींचा निधी, पाणीपुरवठा योजना, तसेच विविध ठिकाणी जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत. हिंगोणे येथील बोरी नदीवर १३४ कोटींच्या जलसंधारण कामामुळे शेतकऱ्यांना कृषी संजीवनी मिळाली आहे.
धार्मिक स्थळांचा विकास आणि श्रद्धास्थानांचे जतन
कपिलेश्वर मंदिर तसेच नंदगाव येथील श्रीराम मंदिरासाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर आणि गोवर्धन येथील काळभैरव मंदिराचे संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. या कार्यामुळे श्रद्धास्थानांचा दर्जा वाढविण्यात पाटील यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकासाचे व्यापक कार्य
गटातील अनेक गावांमध्ये रस्ते काँक्रीटीकरण, ग्रामपंचायत कार्यालय, संरक्षण भिंती, शाळा खोली बांधकाम, सभामंडप उभारणे, स्मशानभूमी सुधारणा, तसेच पेव्हर ब्लॉक आणि भक्तनिवास यासारखी कामे करण्यात आली आहेत. यासाठी विविध गावांमध्ये कोट्यवधींचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे जनतेचा विश्वास आणि पाठिंबा पाटील यांना मिळत असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदानात महायुतीच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद
गावोगावी विकासाची पावले उचलल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना या गटातून भरघोस मतदान मिळेल, असा विश्वास अॅड. व्ही. आर. पाटील यांनी व्यक्त केला. “प्रचार दौऱ्यात गावागावांतून अनिल पाटील यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, आणि मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर मतांचा पाऊस पडेल,” असेही त्यांनी म्हटले.