जळगाव समाचार | २० ऑक्टोबर २०२५
अमेरिकेत रविवारी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे जन आंदोलन उसळले. ‘नो किंग्स प्रोटेस्ट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेत देशातील २,६०० हून अधिक शहरांमध्ये एकाच वेळी रॅली काढण्यात आल्या. तब्बल ७० लाख नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होत ट्रम्प प्रशासनाच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध केला. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर, बोस्टन, अटलांटा आणि शिकागोसह वॉशिंग्टन व लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. रिपब्लिकन पक्षाने या निदर्शनांना “हेट अमेरिका रॅलीज” असे संबोधले.
दरम्यान, राष्ट्रपती ट्रम्प यांनी या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना त्यांच्या ट्विटर अकाउंटवर २० सेकंदांचा एआय-जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांना मुकुटधारी लढाऊ विमानाच्या पायलटच्या रूपात दाखवण्यात आले असून, त्यांच्या जेटवर “किंग ट्रम्प” असा मजकूर दिसतो. व्हिडिओमध्ये ते निदर्शकांवर विष्ठा फेकताना दाखवले गेल्याने त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हे आंदोलन ट्रम्प यांच्या कार्यकाळातील तिसरे मोठे जनआंदोलन ठरले आहे. अमेरिकेत सध्या शटडाउन सुरू असल्याने अनेक सरकारी सेवा ठप्प आहेत, तर प्रशासन, संसद आणि न्यायव्यवस्थेत संघर्ष वाढला आहे. लोकशाही आणि न्यायाच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. “या देशात काय चालले आहे, हेच आता समजत नाही,” असे ह्युस्टनमधील माजी यूएस मरीन कॉर्प्स सैनिक डॅनियल गेमेझ यांनी सांगितले. यावेळी सर्व आंदोलन शांततेत पार पडले असून, कोणतीही अटक झालेली नाही. न्यूयॉर्क शहरात एकट्यानेच एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

![]()




