जळगाव समाचार डेस्क | १४ डिसेंबर २०२४
ओपनएआय (OpenAI) कंपनीचा माजी संशोधक आणि ChatGPT विकसित करण्यात मोलाचे योगदान देणारे सुचीर बालाजी (२६) यांचा मृतदेह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना २६ नोव्हेंबर रोजी घटनेची माहिती मिळाली होती, मात्र हा धक्कादायक प्रकार आता सार्वजनिक झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही आत्महत्या असल्याचा संशय आहे, कारण घटनास्थळी कोणतेही संशयास्पद पुरावे आढळले नाहीत. सुचीर बालाजी मागील काही दिवसांपासून मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्या मित्रांनी चिंता व्यक्त करत पोलिसांना याबाबत कळवले होते.
२६ नोव्हेंबर रोजी सुमारे दुपारी १ वाजता सॅन फ्रान्सिस्कोच्या बुकानन स्ट्रीट येथील बालाजी यांच्या फ्लॅटवर पोलिस पोहोचले. त्यांनी बालाजी यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्येसारखी वाटत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
सुचीर बालाजी यांनी ओपनएआयवर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर पद्धतीने उत्पादन विकसित केल्याचा आरोप केला होता. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिकरित्या ओपनएआयवर ही टीका केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे इंटरनेट इकोसिस्टिमला धोका निर्माण होईल.
सुचीर बालाजी हे मूळचे कॅलिफोर्नियाच्या कूपर्टिनो येथील रहिवासी होते. त्यांनी यूसी बर्कले येथून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी AI च्या मदतीने वाढत्या वयावर नियंत्रण आणि गंभीर आजार बरे करण्यासंदर्भातील प्रकल्पांवर काम केले.
बालाजी यांनी ChatGPT विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, ओपनएआयमध्ये असलेल्या काही चुकीच्या गोष्टींबद्दल त्यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या मते, कंपनीने लेखक, प्रोग्रॅमर आणि पत्रकारांचे कॉपीराइट कंटेंट बेकायदेशीररीत्या वापरले होते.
सॅन फ्रान्सिस्को पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बालाजी यांच्या आत्महत्येच्या कारणांवर अजूनही संशय आहे. त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे.
सुचीर बालाजी यांचा मृत्यू AI आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.