जळगाव समाचार डेस्क | १४ नोव्हेंबर २०२४
महामार्गावर खोटेनगर जवळ 13 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा 108 रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. रुग्णवाहिकेतील रुग्णांना तत्काळ खाजगी वाहनाद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि परिवहन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. रुग्णवाहिका फोर्स मोटर्स या कंपनीकडून बनविलेली असून, फोर्स मोटर्सचे तज्ज्ञ पथक देखील तपासासाठी जळगावकडे रवाना झाले आहे. ते पोलीस आणि परिवहन विभागाला आवश्यक मदत करणार आहेत. तसेच, 108 रुग्णवाहिका व्यवस्थापनालाही तपासासाठी बोलावण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेची अखंडता कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला इतर जिल्ह्यातून पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील रुग्णसेवा सुरळीत राहील.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी भेट दिली. संपूर्ण घटनेवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे लक्ष ठेवून असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.