जळगाव समाचार | २१ मे २०२५
अमळनेर तालुक्यातील मंगरुळ एमआयडीसीजवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भटू पाटील ऊर्फ भटू बाबा असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे भटू पाटील प्रवासासाठी रिक्षाने निघाला होता. मंगरुळ एमआयडीसीजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या चाकचाकी वाहनाने रिक्षाला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि भटू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेला आणखी हृदयद्रावक वळण देणारी बाब म्हणजे – भटू पाटील याचा तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला होता. मित्रपरिवाराने जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कोणाला कल्पनाही नव्हती की, काही दिवसांतच काळाचा घाला येईल.
याहूनही अधिक दु:खद बाब म्हणजे भटूने अडीच महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. नव्या संसाराचे स्वप्न उराशी बाळगून तो आयुष्याची नवी वाट चालत होता. मात्र नियतीने वेगळाच खेळ रचला होता. अपघाताची बातमी कळताच त्याच्या पत्नीचा आणि आई-वडिलांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.
भटू पाटीलच्या आकस्मिक निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकरी यांच्यावर शोककळा पसरली आहे.