जळगाव समाचार | २९ जानेवारी २०२६
महाराष्ट्राच्या राजकारणावर तीन ते चार दशके ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना आज बारामतीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. रुग्णालयातून निघालेली अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचताच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक भावूक झाले. “अजितदादा परत या…” असा आर्त टाहो परिसरात घुमत होता. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला जनसागर अश्रूंनी डबडबला होता आणि संपूर्ण बारामती शोकमग्न झाली होती.
आज सकाळी सुमारे १० वाजता अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले. पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी परिसरात गर्दी केली होती. “अजितदादा अमर रहे”, “कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. विधीवत मंत्रोच्चारानंतर दादांना शासकीय सलामी देण्यात आली.
यानंतर अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि धाकटे चिरंजीव जय पवार यांनी दादांना मुखाग्नी दिला. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत हृदयद्रावक ठरला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘दादा पर्व’ संपल्याची भावना सर्वांनाच हतबल करून गेली. दादांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले असताना संपूर्ण वातावरण जड झाले होते.
दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, छगन भुजबळ, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, शाहू महाराज छत्रपती, हसन मुश्रीफ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, महादेव जानकर आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पवार कुटुंबीयांचे सांत्वन करताना अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या; ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्येही कडकडीत शुकशुकाट पाहायला मिळाला.

![]()




