जळगाव जिल्ह्यात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क…

जळगाव समाचार | ७ नोव्हेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक काटेकोरपणे राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर एकाचवेळी नाकाबंदी व ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. सायंकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान चाललेल्या या मोहिमेत तब्बल २६९ पोलिसांचा सहभाग होता. चार तासांच्या या गस्त मोहिमेत २,४५८ वाहनांची तपासणी करण्यात आली, तर विविध संशयित ठिकाणांसह १३५ हॉटेल्स आणि लॉजेसची पाहणी करून गुन्हेगारी हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. जिल्ह्यातील तडीपार व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या ८२ जणांची पडताळणी देखील करण्यात आली.

या धडक मोहिमेत पोलिसांनी अनेक गंभीर कायद्यांतर्गत कारवाया नोंदवल्या. प्रोव्हीजन कायद्यान्वये ९०, जुगारविरोधी ३४, अंमली पदार्थविरोधी २२ NDPS गुन्ह्यांवर कारवाई झाली. तसेच शस्त्र बाळगण्यावर १ गुन्हा आणि महा.पो.का.क. १२२ अन्वये १४ प्रकरणे दाखल करण्यात आली. याशिवाय विविध न्यायालयांकडून जारी केलेल्या १४८ NBW वॉरंट्स बजावण्यात पोलिसांना यश मिळाले, ही या मोहिमेची महत्त्वाची कामगिरी ठरली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली. मोटार वाहन कायद्यान्वये ६७१ प्रकरणांतून ₹५,१०,३५० इतका दंड वसूल करण्यात आला. जळगाव जिल्हा पोलिसांच्या समन्वयित आणि सर्वसमावेशक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम कसण्यासाठी अशीच धडक मोहिम पुढेही सातत्याने राबवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here