बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात; गंभीर जखमी…

 

जळगाव समाचार | २८ जानेवारी २०२६

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विशेष विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत अजित पवार जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या वृत्तास अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती व परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले असून, अजित पवार यांच्यासोबत प्रवास करणारे काही कर्मचारी व सुरक्षा रक्षक जखमी झाल्याचीही चर्चा आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अनौपचारिकरीत्या बोलले जात आहे.

या घटनेची माहिती पसरताच बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजित सभास्थळी उपस्थित असलेले कार्यकर्ते विमानतळ व रुग्णालयाच्या दिशेने धाव घेताना दिसले. प्रशासनाकडून नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसून, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here