जिल्ह्यात अजितदादांची जनसन्मान यात्रा ! त्यात नाराज पदाधिकाऱ्यांची जत्रा…

जळगाव समाचार डेस्क। १२ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने संपूर्ण महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा सुरू केली असून, आज सोमवारी ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. यानिमित्त अमळनेर येथे पक्षातर्फे युवा संवाद आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत गेल्या आठवड्यात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे अजित पवारांच्या यात्रेवर सावट टाकण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने फक्त चार ठिकाणी उमेदवार उभे केले होते, ज्यामध्ये तीन ठिकाणी त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला. स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीत सुप्रियाताई पवार यांच्याकडून पराभूत झाल्या. काका शरद पवार यांच्याविरोधात केलेले बंड अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत महागात पडले. या पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा भाग म्हणून आज अमळनेर तालुक्यात युवा संवाद आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

तथापि, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत कलहाची छाया पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेची निवडणूक जवळ येत असताना महाविकास आघाडीने जळगाव जिल्ह्यात आपली वज्रमूठ तयार केली आहे, तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट मात्र अंतर्गत विसंवादामुळे कमजोर झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यात पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निष्क्रियतेचा आरोप करत आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिला आहे. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस निंबाजीराव पाटील, आणि धरणगाव तालुकाध्यक्ष शामकांत पाटील यांचा समावेश आहे. भाजपासोबत सत्ता असूनही राष्ट्रवादीकडून कोणतीही लोकहिताची कामे होत नसल्याची आणि कार्यकर्त्यांची समित्यांवर नियुक्ती न झाल्याची नाराजी या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अंतर्गत कलहाचे परिणाम अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर कसे पडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here