जळगाव समाचार डेस्क| १० ऑक्टोबर २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज 11 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते अमळनेर तालुक्यातील विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्याचा मुख्य उद्देश महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा आहे. दुपारी, ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभार्थी सन्मान सोहळ्यात सहभागी होतील. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना योजनेचे लाभ पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांचा मेळावा देखील या दौऱ्यात आयोजित केला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण जीवनज्योती अभियानाला चालना देण्यावर भर देणारा हा दौरा जिल्ह्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या उपस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील विकास प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.