जळगाव समाचार डेस्क | १६ डिसेंबर २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत जवळपास ७० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, केवळ ३० टक्केच जुने चेहरे मंत्रिमंडळात कायम ठेवले आहेत. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले असून, छगन भुजबळ, प्रतोद अनिल पाटील आणि आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांसारख्या दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा धाडसी निर्णय अजित पवारांनी घेतला आहे.
भुजबळांसारख्या दिग्गज नेत्यांना घरी पाठवले
ओबीसी समाजाचे प्रमुख नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळणे हा अजित पवारांचा निर्णय मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. भुजबळ यांना वगळूनही त्यांनी हा निर्णय घेतला, यामुळे त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे हे आता एकमेव ओबीसी मंत्री आहेत. याशिवाय, तीन मराठा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले आहे.
भाजपच्या दबावाचा प्रभाव?
भाजपने ईडीच्या चौकशीचा ठपका असलेल्या हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा आग्रह केला होता. मात्र, पवारांनी त्यांना पदावर कायम ठेवत भाजपचा दबाव नाकारल्याचे दिसत आहे. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले गेले आहे.
महिला प्रतिनिधित्व आणि अदिती तटकरे यांची निवड
अजित पवारांनी मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधित्व कायम ठेवत अदिती तटकरे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने त्यांनी महिला मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
नव्या चेहऱ्यांसाठी मोठा बदल
अजित पवार यांनी जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मोठा बदल केला आहे की भाजपच्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, यावर सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, हसन मुश्रीफ यांना दिलेली संधी आणि तीन मराठा नेत्यांचा समावेश या निर्णयांमुळे पवारांनी भाजपच्या दबावाला पूर्णतः झुकले नाही, असे दिसते.
अजित पवारांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरण तयार होणार की पक्षांतर्गत अस्वस्थता वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.