जळगाव समाचार | १२ जून २०२५
गुजरातमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान भीषण अपघातात कोसळले आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. अपघातात विजय रुपाणी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
AI 171 क्रमांकाचे हे बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि मेघानीनगर परिसरातील एका रहिवासी इमारतीवर आदळले. अपघातानंतर विमानाने पेट घेतला आणि प्रचंड ज्वाळा व धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले.
घटनेनंतर लगेचच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमींना तातडीने जवळील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून वैद्यकीय टीम पूर्ण क्षमतेने काम करत आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक विभागाकडून अधिकृत तपास सुरू करण्यात आला आहे.

![]()




