जळगाव समाचार डेस्क | २१ जानेवारी २०२५
कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलदगतीने आणि सोप्या पद्धतीने मिळावा यासाठी केंद्र सरकारने अॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून दिला जाणार आहे.
भुसावळ तालुक्यातील अॅग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 20 जानेवारी रोजी उपविभागीय कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. गावातील महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक आणि सेवा केंद्र चालक या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
फार्मर आयडी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सहज मिळणार आहे. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी, पिक विमा योजना, नुकसान भरपाई, पीक कर्ज, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती आणि पिकाबद्दल सल्ला यांचा समावेश आहे.
भुसावळ तालुक्यातील 25,400 शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र किंवा सीएससी चालकांकडे जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
आजपासून (21 जानेवारी) गावोगावी कॅम्प मोडवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ तहसीलदारांनी केले आहे.