जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५
बेलीजमध्ये ट्रॉपिक एअरच्या एका लहान प्रवासी विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका अमेरिकी नागरिकाने केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत त्याने प्रवाशांवर हल्ला केला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, एका प्रवाशाने हल्लेखोरावर गोळी झाडून त्याला ठार मारले.
ही घटना ट्रॉपिक एअरच्या सेसना ग्रँड कॅरवन विमानात घडली. हे विमान कोरोजाल शहरातून सॅन पेद्रो बेटाच्या दिशेने जात होते. हल्लेखोराचे नाव अकिनेला सावा टेलर असून तो अमेरिकन नागरिक आहे. त्याने विमानातील पायलटला देशाबाहेर नेण्यासाठी धमकावले.
विमान काही काळ बेलीज सिटीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घिरट्या घालत होते. इंधन संपल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरले. त्याचवेळी हल्लेखोराने दोन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. मात्र एका प्रवाशाकडे परवानाधारक बंदूक होती. त्याने प्रसंगावधान राखत गोळी झाडली आणि हल्लेखोराला ठार केले.
पोलीस आयुक्त चेस्टर विल्यम्स यांनी त्या प्रवाशाला “हिरो” असे संबोधले आहे. सध्या ही घटना कशी घडली, हल्लेखोराने चाकू विमानात कसा आणला याचा तपास सुरू असून, अमेरिकी दूतावासाचीही मदत घेतली जात आहे.