जळगाव समाचार डेस्क। ८ ऑगस्ट २०२४
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
1 डिसेंबर 2018 रोजी आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांसाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांना ही मुदतवाढ दिली जात आहे.
शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून शिक्षकांना सेवाविषयक लाभ दिले जातील. ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत जे शिक्षक TET उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनाही पुढील सेवाविषयक लाभ मिळतील.
ही मुदतवाढ केवळ एक वेळची देण्यात येत आहे. दोन वर्षांच्या मुदतवाढीनंतरही जे शिक्षक शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.
या निर्णयाचे आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या मुदतवाढीमुळे त्यांना आवश्यक ती तयारी करून परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी मिळेल.