जळगाव समाचार डेस्क | २५ जानेवारी २०२५
भरधाव गाडीच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अडावद गावात घडली. २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ग्रामपंचायत गल्लीमध्ये ही घटना घडली.
ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने वेगाने येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो (क्रमांक: MH-39-J-7424) गाडीने प्रियांशी संदिप पाटील या दीड वर्षाच्या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर प्रियांशी गाडीच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेवेळी प्रियांशीची आई सुवर्णा पाटील ताक आणण्यासाठी घरासमोरील दुकानात जात होत्या. त्या मागोमाग रस्ता ओलांडणाऱ्या प्रियांशीला ही धडक बसली.
या प्रकरणी प्रियांशीच्या आईच्या फिर्यादीवरून गाडीचालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, तपास हवालदार भरत नाईक करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.