अडावद येथील घटना , काही संशयित ताब्यात
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडावद येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय तरुणाचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून निर्गुण खून केल्याचा प्रकार एक रोजी सकाळी भगवान नगर येथे उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह श्वान पथकाने धाव घेतली. दरम्यान या खून प्रकरणी पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.बापू हरी महाजन (वय- ३५ )रा. लोखंडे नगर अडावद असे मयत तरुणाचे नाव आहे
अडावद येथील भगवान नगरमध्ये मोकळ्या जागेवर एका तरुणाचा खून झाल्याची माहिती सोमवारी सकाळी पोलीसांना मिळताच अडावदचे सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजु थोरात, भरत नाईक, संजय धनगर, सतीश भोई, विनोद धनगर, भुषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत, चंद्रकांत कोळी, प्रवीण महाजन, संजय शेलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत तरुण हा लोखंडे नगरमधील बापू हरी महाजन (वय- ३५ )असल्याचे समजले.
या तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री बापूचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे.
सपोनि प्रमोद वाघ यांनी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले. काही वेळातच हे. काँ. विनोद चव्हाण, पो.ना. प्रशांत कंखरे हे ‘चॅम्प’ नामक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. कविता नेरकर, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे व त्यांची टीम तसेच ठसे तज्ञ किरण चौधरी, रफिक शेख हे दाखल झाले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे घेतले .मयताच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.