जळगाव समाचार | २९ डिसेंबर २०२५
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात महायुतीच्या माध्यमातून लढण्यावर तत्त्वतः एकमत झाले असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली असतानाही जागांचे नेमके गणित ठरलेले नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः भाजपने किमान ५० जागांवर ठाम भूमिका घेतल्याने शिंदे गट आणि अजित पवार गट अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात महायुतीतील नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही काही काळ उपस्थिती लावली. दुपारी दीड ते साडेचार या वेळेत महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असताना शासकीय विश्रामगृहात राजकीय बैठक घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. नेत्यांच्या वाहनांचा थेट विश्रामगृहाच्या आवारात प्रवेश झाल्यानेही नियमभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी तक्रार केल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी आपण केवळ काही मिनिटांसाठी वॉशरूमसाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांना “आचारसंहिता आहे, थोडी माणुसकी ठेवा,” अशी प्रतिक्रिया दिली. या घडामोडींमुळे जिल्हाधिकारी याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

![]()




