जळगाव शहरात अपघातांची मालिका सुरूच; कारच्या धडकेत 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको…

 

जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑगस्ट २०२४

 

जळगाव शहरातील अपघातांच्या मालिकेत आणखी एक दुर्दैवी घटना घडली. ३१ ऑगस्ट रोजी, भरधाव कारच्या धडकेत ७८ वर्षीय अजबसिंग नारायण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आहुजानगर परिसरातील संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
माहितीनुसार, अजबसिंग पाटील हे द्वारका नगर येथे आपल्या मुलीकडे राहत होते, तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील यावल तालुक्यात शेतीकामासाठी आपल्या कुटुंबासह राहत होता. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास, अजबसिंग पाटील हे द्वारका नगर स्टॉपजवळील झाडाखालील पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडताना, जळगावहून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे ते जागीच ठार झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला.
वृद्धाच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आणि त्यांनी आहुजानगर येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. घटनास्थळी आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल होईपर्यंत आणि महामार्गावरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही न होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
महामार्गावर दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी, ठेकेदारावर कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आणि खड्डे तातडीने बुजवण्याचे वचन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here