जळगाव समाचार | २७ सप्टेंबर २०२५
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावर शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्यासह १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातातील मृतांमध्ये नितेश जगतसिंह चौहान (४५), सुनिता नितेश चौहान (३५) आणि सुखविंदर नितेश चौहान (१५, तिन्ही रा. मातापूर, ता. खकनार, जि. बऱ्हाणपूर) यांचा समावेश आहे. तर मुलगा नेहाल नितेश चौहान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौहान कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील असले तरी सध्या जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात वास्तव्यास होते.
इंदूर–हैदराबाद महामार्गाचे काम सुरू असताना कंत्राटदाराचा डंपर बऱ्हाणकडून भरधाव वेगाने येऊन दुचाकीसह उभ्या चौहान कुटुंबाला जोरदार धडकला. या धडकेत पती-पत्नी व मुलगा सुखविंदर डंपरच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. तर नेहाल हा मुलगा महामार्गाच्या बाजुला फेकला गेल्याने सुदैवाने बचावला, मात्र त्याला गंभीर दुखापत झाली. चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आग विझवून मोठा अनर्थ टाळला. चालक महेंद्र प्रसाद (रा. महुआबांध, म.प्र.) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गृहरक्षक दलाचे जवान अमोल गुंजाळ यांनी तत्काळ जखमी मुलाला रुग्णालयात हलवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. महामार्गावरील कंत्राटदाराच्या वाहनांचा अतिवेग अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असून, याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.