धक्कादायक! वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या धाडसी भाग्यश्रीचा अपघातात मृत्यू…

जळगाव समाचार | १३ मे २०२५

अमळनेर तालुक्यातील एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. जानवे गावातील भाग्यश्री दीपक पाटील या १७ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. १२ मे रोजी रात्री साडे आठच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने कट मारल्याने तिची मोटरसायकल झाडावर आदळली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे ती खाली पडली आणि रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला.

भाग्यश्री आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात मदत करत असे. ती दूध घेऊन कधी अमळनेर, तर कधी धुळे शहरात एकटीच मोटरसायकलवर जात असे. दीड महिन्यांपूर्वी वडिलांचा अपघात झाल्यामुळे त्यांनी वाहन चालवणे थांबवले होते आणि जबाबदारी भाग्यश्रीने उचलली होती.

अपघाताची माहिती मिळताच गावकरी तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्रीने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तिला पोलीस खात्यात भरती व्हायचे स्वप्न होते. पण काळाने तिचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचा दुर्दैवी अंत झाला. जानवे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here