जळगाव समाचार डेस्क;
परोळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातातील जखमी यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. मयत चंदू अरुण चौधरी (46) हे नाशिक येथून मुलाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घरी येत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. (Accident Jalgaon District)
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, चंदू अरुण चौधरी (46) हे फैजपूर येथे पत्नी आणि मुलगा यांच्यासह वास्तव्याला होते. फैजपूर येथील दक्षिण बाहेर पेठमध्ये सलून दुकान चालवून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मुलगा कल्पेश याचे कॉम्प्युटर डिप्लोमासाठी नाशिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ते पत्नी ज्योती आणि मुलगा कल्पेश यांच्यासोबत चार चाकी वाहनाने ६ जुलै रोजी सकाळी नाशिक येथे गेले होते. मुलाची महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ते रात्री फैजपूर येथे येण्यासाठी चार चाकी वाहनाने निघाले होते.
दरम्यान, ७ जुलै रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास पारोळा गावाजवळ वाहन थांबून चाकातील हवा पाहण्यासाठी ते उतरले. त्याचवेळी त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात चंदू हे गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शनिवारी १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. याबाबत रामानंद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कालसिंग बारेला हे करत आहे.
उपचारादरम्यान चंदू यांचा मृत्यू झाल्यानंतर या त्यांच्या पत्नी आणि मुलाने एकच आक्रोश केला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.