जळगाव समाचार | २९ जानेवारी २०२६
एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी लाच मागून स्वीकारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईत दोघांना रंगेहात अटक केली आहे. एसीबी नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८/२०२६ नोंदविण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईत नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल यांच्यावर कारवाई करण्यात आली. तक्रारदाराचा ट्रॅक्टर २७ जानेवारी २०२६ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी आरोपी तलाठ्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान ही रक्कम वाढवून ३० हजार रुपये करण्यात आली. “इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून ३० हजार घेतो,” असे आरोपींनी सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष मागणीची पडताळणी करण्यात आली व त्यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील खोलीत आरोपी शिवाजी घोलप यांनी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत ३० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने दोघांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान नरेश शिरूड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख, सुमारे २,९५० रुपये किमतीची Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्कीची बाटली (गिफ्ट पॅक) व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. पथकात पो.नि. हेमंत नागरे, पो.अं. प्रदीप पोळ, पो.अं. अमोल सूर्यवंशी व पो.अं. सचिन चाटे यांचा समावेश असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

![]()




