जळगाव समाचार | ११ जून २०२५
महावितरणच्या कंत्राटी वायरमनने वीज मीटर बदलण्याच्या कामात नागरिकाकडून पाच हजारांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अँन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) पथकाने या वायरमनला रंगेहात पकडले असून, या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
महावितरणच्या प्रभात कॉलनी कक्षात कार्यरत असलेल्या भूषण शालिग्राम चौधरी (३७) याने ही लाच मागितली होती. तक्रारदाराच्या घरावरील वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावे होते. हे मीटर बदलण्यासाठी चौधरी तक्रारदाराच्या घरी आला असता त्याने मीटरचे सील तुटल्याचे सांगत वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गुन्हा टाळण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट अनुकूल मिळवण्यासाठी त्याने सुरुवातीला तब्बल १५ हजारांची मागणी केली. मात्र, शेवटी पाच हजारांवर सौदा ठरला.
तक्रारदाराने हा प्रकार एसीबीच्या जळगाव कार्यालयात कळवताच, एसीबीने तक्रारीची पडताळणी केली व सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी चौधरीने तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताच, पंचासमोर त्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, हॅश व्हॅल्यू नोंदवण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ सुनील वानखेडे व पोकॉ अमोल सूर्यवंशी सहभागी झाले होते. या कारवाईस नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, आरोपी भूषण चौधरी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँन्टी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक १०६४, मोबाईल ९७०२४३३१३१ व दूरध्वनी ०२५७-२२३५४७७ उपलब्ध आहेत.

![]()




