धुळ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर धाड ; डॉक्टरसह तीन महिलांना अटक…

जळगाव समाचार | १ एप्रिल २०२५

शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर सोमवारी सकाळी प्रशासनाने कारवाई केली. या ठिकाणी २१ वर्षीय अविवाहित तरुणी गर्भपातानंतर अत्यवस्थ स्थितीत आढळली. चौकशीत दिवसभरात चार महिलांचे गर्भपात करण्याचे नियोजन असल्याचे उघड झाले.

महापालिकेच्या पीसीपीएनडीटी विभागाकडे या हॉस्पिटलविषयी तक्रार मिळाल्यानंतर पथकाने एका महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवले. तिचा मोबाइल सुरू ठेवून पुरावा गोळा करण्यात आला. रुग्णाची कोणतीही तपासणी न करता तिला गर्भपातासाठी औषधे दिली गेली.

तपासादरम्यान, या अवैध गर्भपातासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये घेतले जात असल्याचे समोर आले. सोमवारी दिवसभरात चार गर्भपात होणार होते, ज्यातून एक लाख रुपयांची कमाई होणार होती.

ही कारवाई सुरू असताना पोलिसांनी हॉस्पिटलमधून डॉक्टरसह तीन महिलांना अटक केली. तसेच एका महिलेला साक्षीदार म्हणून तक्रारीत समाविष्ट करण्यात आले. गर्भपात केलेली तरुणी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे, हे हॉस्पिटल यापूर्वीही गैरप्रकारांसाठी चर्चेत होते. १९ मार्चला प्रशासनाने हे हॉस्पिटल आणि दोन सोनोग्राफी केंद्र सील केले होते. मात्र, ऑनलाइन तक्रारीनंतर पुन्हा येथे अवैध गर्भपात सुरू असल्याचे उघड झाले.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, सुरत कनेक्शन आणि एजंट नेटवर्कबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here