जळगाव समाचार | ४ मार्च २०२६
जळगाव शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकाने मालमत्ता करावरील थकबाकीच्या शास्ती रकमेवर सवलत देणारी ‘अभय योजना’ जाहीर केली असून, ०५ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दंड पूर्णपणे माफ करण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना केवळ मूळ कर भरून थकबाकीमुक्त होता येणार आहे. शहराच्या विकासकामांसाठी महसूल वाढविणे आणि नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे महापौरांनी सांगितले.
कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून QR कोड स्कॅनिंग, नेट बँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच विविध UPI ॲप्सद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या या १५ दिवसांच्या सवलतीचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या थकबाकीचा प्रश्न निकाली काढून शहराच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.

![]()




