जळगाव समाचार | १२ एप्रिल २०२६
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत गेला आणि अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली असून, त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीसह संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आनंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला होता आणि त्यांच्या अवयवांनी प्रतिसाद देणे कमी केले होते. त्यामुळे उपचारांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. उद्या सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील लोअर परळ येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले यांनी केवळ दहाव्या वर्षी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या चिरतरुण आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे त्यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन त्यांनी गिनीज बुकमध्ये सर्वाधिक गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून नोंद मिळवली होती. आज त्या आपल्या सोबत नसल्या, तरी त्यांचा स्वर आणि गाणी पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

![]()




