“स्वदेशी वापरा” आमदार सुरेश भोळे यांचे शिक्षकांना आवाहन

 

जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२५

झूलेलाल सिंधी एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध शाळांमधील १५० कार्यरत शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जळगावचे शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात आमदार भोळे यांनी शिक्षकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी सुचवले.

यावेळी आमदार भोळे म्हणाले, “शिक्षकांनी आपल्या शारीरिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. नियमित सायकल चालवणे, व्यायाम करणे यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि विद्यार्थ्यांसाठी चांगला आदर्शही निर्माण होतो.” त्यांच्या या मार्गदर्शनाने शिक्षकांना आरोग्याबाबत सजग राहण्याचा संदेश मिळाला.

कार्यक्रमात सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार आडवाणी, सचिव वासुदेव तलरेजा, कोषाध्यक्ष सुशिल वालेचा, हरेश तोलाणी, विजय हासवाणी, अशोक मंधाण आणि रमेश मत्ताणी यांनी आमदार भोळे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक दयानंद विसराणी यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष राजकुमार आडवाणी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती कोमल साधवाणी आणि विद्यार्थीनी कु देवयानी सपकाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श सिंधी हायस्कूलचे मुख्याध्यापक बालचंद काटपाल, न्यू आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सीमा आडवाणी तसेच दोन्ही शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here