जळगावात सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला, वाहनाची तोडफोड

 

जळगाव समाचार | ११ एप्रिल २०२६

जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोविंदा रिक्षा स्टॉप ते रिंग रोड मार्गे बहिणाबाई उद्यान चौकाकडे जात असताना हॉटेल सायली परिसरात त्यांना अडवून हल्ला करण्यात आला. या प्रकरणात विशाल अहिरे या व्यक्तीने आपल्या साथीदारांसह हल्ला केल्याचा आरोप स्वतः मुकुंद सपकाळे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॅनर छपाईच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर अचानक हिंसक प्रकारात झाले. हल्लेखोरांनी लाठ्या, काठ्या आणि धारदार शस्त्रांच्या साहाय्याने सपकाळे यांच्या चारचाकी वाहनावर तुफान हल्ला चढवला. वाहनाच्या सर्व बाजूंच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी थेट मुकुंद सपकाळे यांनाच लक्ष्य करत त्यांच्यावरही हल्ला केला, ज्यात ते जखमी झाले. परिसरात आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, नागरिकांचा वाढता हस्तक्षेप पाहून हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.

दरम्यान, जखमी मुकुंद सपकाळे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here