जळगाव समाचार | १० एप्रिल २०२६
जळगाव जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक पदावर बदल करण्यात आला असून, जळगावचे विद्यमान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप रघुनाथ गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या गृह विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी अधिकृतपणे जारी करण्यात आले.
संदीप रघुनाथ गावित हे लवकरच जळगाव जिल्ह्याचे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावित यांचे जळगाव जिल्ह्याशी पूर्वीपासूनच निकटचे नाते असून, त्यांनी यापूर्वी जळगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. स्थानिक भौगोलिक परिस्थिती, गुन्हेगारीचे स्वरूप आणि सामाजिक घडामोडींचा त्यांना असलेला अनुभव लक्षात घेता, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बदली झालेल्या अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. तसेच विविध संवेदनशील प्रसंगी त्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडत पोलीस दलाची प्रतिमा उंचावली.

![]()




