जळगाव महापालिकेची महासभा १५ एप्रिल रोजी; अनेक विषयांवर निर्णायक चर्चा आणि निर्णय संभव…

 

जळगाव समाचार | ८ एप्रिल २०२६

जळगाव महानगरपालिकाची महासभा बुधवारी, १५ एप्रिल रोजी महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून, या सभेत राजकीय नियुक्त्यांपासून ते शहराच्या पायाभूत सुविधांपर्यंतच्या एकूण १२ महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन निर्णायक निर्णय घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार, पक्षांच्या तौलनिक संख्याबळाच्या आधारे सात रिक्त जागांसाठी नामनिर्देशित सदस्यांची निवड हा या सभेतील केंद्रबिंदू ठरणार आहे. आयुक्तांच्या शिफारशींनुसार या सदस्यांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून, यामध्ये भाजपतर्फे चार, शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे दोन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे एका सदस्याची निवड अपेक्षित आहे.

याचबरोबर, प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्याचा प्रस्तावही सभेपुढे ठेवण्यात आला आहे. शहर नियोजनाच्या दृष्टीने प्रभाग समित्यांचे पुनर्गठन आणि जळगाव शहराच्या एकत्रित सुधारित प्रारूप विकास योजनेला (डीपी प्लॅन) मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे शहरातील प्रमुख नाले व उपनाल्यांच्या मान्सूनपूर्व साफसफाईस गती देण्याबाबतही निर्णय अपेक्षित असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेहरुण परिसरातील टी.बी.एस. हॉस्पिटल परिसरात डॉग शेल्टर, हेल्थ क्लिनिक आणि फूड स्टोअर उभारण्यासाठी सुमारे ५१ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महासभेत मांडण्यात आलेल्या अशासकीय प्रस्तावांमध्ये शहराच्या सांस्कृतिक व भावनिक विषयांनाही स्थान देण्यात आले आहे. रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनच्या मागणीनुसार स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. तसेच, शिवाजी नगर येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल आणि रिंगरोड ते कानळदा रोड उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुल असे नामकरण करण्याबाबत सदस्यांनी प्रस्ताव मांडले आहेत. पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ सर्कल विकसित करणे तसेच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याबाबतही या महासभेत सखोल चर्चा होणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here