जळगावच्या श्रेयस प्रकाशनातर्फे बाल मराठी संमेलनात बालनाट्य पुस्तकांचे प्रकाशन


जळगाव समाचार | २४ मार्च २०२६

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडलेल्या ‘बाल मराठी संमेलना’च्या मुख्य रंगमंचावर जळगावस्थित श्रेयस प्रकाशनातर्फे बालसाहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यामुळे पुणे व अहिल्यानगर येथील साहित्यिकांच्या बालनाट्यांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध झाले. बालसाहित्य आणि बालरंगभूमीला चालना देणारा हा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष वेधले गेले.

या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रेयस प्रकाशनाचे प्रकाशक योगेश शुक्ल यांच्यासह बालरंगभूमी परिषदेची मध्यवर्ती कार्यकारिणी, विविध क्षेत्रातील साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्ञानेश्वर गायकवाड (पुणे) यांच्या ‘गाऱ्हाणं’ आणि ‘फुलपाखराची गोष्ट’ या बालनाट्य पुस्तकांचे तसेच अनंत जोशी (अहिल्यानगर) यांच्या ‘फुलपाखरू व २ बालनाट्य’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजली धारू यांनी त्यांचे प्रतिनिधित्व केले.

यावेळी बोलताना ॲड. निलम शिर्के सामंत यांनी बालसाहित्याच्या समृद्धीसाठी नवीन संहितांची गरज अधोरेखित केली. “बालसाहित्य आणि बालरंगभूमी अधिक समृद्ध व्हावी यासाठी सातत्याने दर्जेदार साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे. जळगावमधून कार्यरत असलेले श्रेयस प्रकाशन राज्यभरातील लेखकांचे साहित्य प्रकाशित करत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे,” असे त्या म्हणाल्या. या प्रकाशन सोहळ्यामुळे बालनाट्य साहित्याला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here