बांभोरी गावाजवळ पैशाच्या वादातून मित्राचा खून; आरोपी ताब्यात…

 

जळगाव समाचार | २४ मार्च २०२६

बांभोरी येथील रेल्वे पुलाखाली राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये पैशांवरून झालेला वाद हाणामारीत परिवर्तित होऊन त्याचे पर्यवसान खुनात झाले. पिंटू बारेला (रा. वरला, जि. बडवानी) याचा सुनिल बारेला (रा. वरला, जि. बडवानी) याने काठी, दगड आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना काल दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून पाळधी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी गावाजवळील रेल्वे पुलाखाली पिंटू बारेला, त्याची पत्नी सखुबाई बारेला, सुनिल बारेला तसेच कैलास बारेला (रा. पांढरी, ता. चोपडा) हे सर्वजण रेल्वे मार्गावर पडलेल्या रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य गोळा करून उदरनिर्वाह करतात आणि तेथेच झोपडीत वास्तव्यास आहेत. काल दुपारी काही पैसे मिळाल्यानंतर त्यांनी दारू प्राशन केले. त्यानंतर जेवण करत असताना सुनिल बारेला याने पिंटू बारेला याच्यावर पैसे व मोबाईल घेतल्याचा आरोप करत वाद घातला. वाद चिघळताच सुनिलने काठी व दगडांनी मारहाण केली. या वेळी मध्ये पडलेल्या सखुबाई बारेला यांनाही मारहाण करण्यात आली, त्यामुळे त्या जखमी होऊन तेथून निघून गेल्या. त्यानंतर सुनिल बारेला याने पिंटू याच्यावर चाकूने वार केला, ज्यामुळे तो घटनास्थळी निपचित पडला.

घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुनिल बारेला याने पिंटूचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पाळधी रेल्वे स्थानकास माहिती दिली. स्थानक प्रमुखांनी तत्काळ पाळधी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सखुबाई बारेला यांनी मृतदेहाची ओळख पटवून सुनिल बारेला याने खून केल्याची माहिती दिली. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनिल पवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मोबाईल फॉरेन्सिक पथकानेही पुरावे गोळा केले असून सखुबाई बारेला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here