जळगाव समाचार | १६ मार्च २०२६
राज्यातील हवामानात अचानक बदल होत असून जळगावसह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १८ मार्चपासून या बदलत्या हवामानाची सुरुवात होण्याची शक्यता असून १९ आणि २० मार्चदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या काळात काही भागात ताशी ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि प्री-मॉन्सून हालचालींमुळे तापमानात अचानक घट झाली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका काहीसा कमी झाला असला तरी आर्द्रतेमुळे उकाड्याची भावना कायम आहे. कोकणात सध्या पावसाची शक्यता कमी असली तरी अंतर्गत महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सध्या अनेक भागात रब्बी हंगामातील पिकांची कापणी आणि मळणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अचानक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील फळबागांना गारपीट व वादळी वाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे या हवामान बदलाला चालना मिळाली आहे. हरियाणाच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून त्यापासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचे तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिलेल्या माहितीनुसार या वातावरणीय घडामोडींमुळे मार्च महिन्यात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे.
१८ मार्चच्या संध्याकाळपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता असून त्यानंतर मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या दरम्यान काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

![]()




